मुंबई - मुंबई महापालिकेच्या भायखाळा वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान राणीबाग़ मध्ये पेंग्विन पाहण्यासाठी 100 रुपये व 12 वर्षाखालील बालकाना 50 रुपये शुल्क आकारणीचा तसेच सध्याचे प्रवेश शुल्क 10 पटीने वाढीचा प्रस्ताव गटनेता बैठकीत सादर करण्यात आला होता. प्रशासनाने आणलेला हा प्रस्ताव फेटाळण्यात आला असून मार्च अखेर पर्यंत 12 वर्षाखालील बालक व त्यांच्या पालकांना मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी पत्रकारांना दिली.
राणीबाग़ मध्ये पेंग्विनच्या पाहणीसाठीची तयारी येत्या 20 दिवसात पूर्ण होणार असून 25-26 जानेवारीला महापालिका शालेतून प्रथम क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांकडून याचे उदघाटन केले जाणार आहे. प्रशासनाने आणलेल्या दरवाढ़ीच्या प्रस्तावावर पुढे नेमका किती खर्च येणार हे प्रशासनाला कसे माहीत ? पेंग्विनवर व त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधेवर किती खर्च येणार आहे ? प्राणीसंग्रहालयात किती पर्यटक येतात ? याची नेमकी आकडेवारी सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तो पर्यंत 12 वर्षा खालील विद्यार्थ्याना आणि त्यांच्या सोबत असलेल्या पालक किंवा शिक्षकाना मोफत प्रवेश दिला जाणार असल्याचे आंबेकर यांनी सांगितले.
पेंग्विनला सध्या लोकांची सवय नसल्याने मार्च अखेर पर्यंत 12 वर्षाखालील बालक सोबत नसलेल्या कोणात्याही व्यक्तीला सोडण्यात येणार नाही. प्राणी संग्रहालयातील प्रवेश शुल्काचा दरही 1 एप्रिल नंतर ठरवण्यात येणार आहे. प्रवेश शुल्क व पेंग्विन पाहण्यासाठी इतर राज्यातील व परदेशातील दरांचा आढावा घेउन प्रस्ताव सादर केल्यास मुंबईकर नागरीकांना परवडेल असा दर ठरवू असे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सांगितले. 1 एप्रिल नंतर नव्या दराबाबतचा प्रस्ताव सादर झाल्यावर परदेशी पर्यटकांच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्यात येईल अशी माहिती फणसे यांनी दिली आहे.
Post a Comment