मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमधील निरुपम - कामत गटातला वाद अधिक वाढला असून. या वादामुळे उमेदवारांची यादीही काँग्रेसला जाहिर करता आलेली नाही. हा वाद विकोपाला जाऊ नये यासाठी पक्षश्रेष्टींचा प्रयत्न सुरु झाला आहे.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी वरीष्ठ प्रभारी निरीक्षक म्हणून हरीयाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरीष्ठ नेता भुपींदर सिंग हुडा यांना उमेदवारांच्या निवडीप्रकरणी मुबंईत पाठविण्याचा निर्णय घेतला असून येत्या २५ जानेवारी रोजी ते निरुपम आणि कामत यांच्यासह सर्व मुंबई जिल्हाध्यक्षांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत दोन्ही गटातील उमेदवार निवडीबाबत चर्चा केली जाणार आहे.
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेबाबत सोमवारी काँग्रेस पक्षकार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. भाजपाची वाट धरलेल्या कृष्णा हेगडे यांच्या आरोपाला उत्तर देताना निरुपम म्हणाले की, उमेदवारांच्या निवडीसाठी ब्लॉक कमिटी तयार करण्यात येत होती तेव्हा हेगडे उपस्थित होते. यावेळी खासदार प्रीया दत्त यादेखील उपस्थित होत्या. प्रीया दत्त यांनी उत्तर मुंबईसाठी ज्या उमेदवाराचे नाव जाहीर केले त्या उमेदवाराला हेगडे यांचा विरोध होता. मात्र, दत्त यांनी या उमेदवाराबद्दल आत्मविश्वास दाखवला. त्यामुळे अखेर हेगडे यांनी पक्ष सोडल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले आहे.
कामत यांचा मेसेज वाचला नाही- काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर हुडा मुंबईत येत आहेत का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता उमेदवारांची यादीसाठी आणि निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रभारी मुंबईत येतातच असे उत्तर निरुपम यांनी दिले. कामत यांनी आपण निरुपम यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून उमेदवार निवड प्रक्रीयेतून बाहेर पडत असल्याचा मेसेज सर्व कार्यकर्त्यांना पाठवल्याबाबत विचारले असता आपण कामत यांचा असा कुठलाही मेसेज वाचला नसल्याचे सांगितले.
निरुपम यांच्या एकाधिकारशाहीमुळेच पक्ष सोडला - हेगडेकाँग्रेसमध्ये गुन्हेगारांना तिकीट दिले जाते, असा आरोप करतानाच निरुपम यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष म्हणून मनमानी कारभार केला. त्यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळूनच मी पक्ष सोडून भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असे काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी म्हटले आहे. तसेच निरुपम यांच्या एकाधिकारशाहीबद्दल पक्षश्रेष्ठींना कळविले असून जर त्यांनी आपली कार्यपध्दती बदलली नाही तर त्यांचे २५ उमेदवारही निवडून येणार नाहीत असेही हेगडे यांनी स्पष्ट केले आहे.
Post a Comment