मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) –सोन्याची अंडी देणा-या पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आल्याने काहींनी पक्षाला रामराम ठोकला असतानाच दुसरीकडे उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने काँग्रेसमधील महिलांचा एक गटही नाराज झाला आहे. तसेच काही विद्यमान नगरसेविकांनाही उमेदवारी अर्ज मिळण्याची शक्य़ता कमी आहे. खुल्या वॉर्डातून महिलांना उमेदवारी मिळणार नाही असे सांगण्यात येत असल्याचे वृत आहे. त्यामुळे काँग्रेसमधील महिलांचा एक गट बंडाच्या पवित्र्यात असल्याचे समजते.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मधील संजय निरुपम आणि गुरुदास कामत गट उफाळून आला आहे काँग्रेसमधील दोन केंद्रातील वरिष्ठ नेते मुंबईत येऊन हा वाद मिटवण्य़ाचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आलेले दिसत नाही. या वादामुळे काँग्रेसला गळती लागल्याची स्थिती आहे. नगरसेवक भोमसिंग राठोड, परमिंदर भामरा पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, ज्येष्ठ नगरसेविका वकारून्निसा अन्सारी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. काँग्रेस मध्ये बंडखोरी होऊ नये यासाठी उमेदवारांची यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले नाव त्यात नसेल तर अनेकजण पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. ३ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे पक्षाकडूनही उमेदवारी प्रसिद्ध करण्यात उशीर केला जात असल्याचे सांगण्यात येते गेल्या पाच वर्षांत विरोधकांनी विविध मुद्दय़ांवरून सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते. त्यात काँग्रेसच्या काही नगरसेविका आघाडीवर होत्या. मात्र या नगरसेविकांनाच पालिकेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारी द्यायची नाही असा निर्णय काही नेत्यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे विद्यमान नगरसेविका आणि इच्छुक महिला कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. तर काही विभागांतील आमदार मंडळी विद्यमान नगरसेविकांना उमेदवारी देण्यास अनुकूल नाहीत. भविष्यात याच नगरसेविका आमदार पदाच्या उमेदवारीसाठी दावेदार होतील. अशी भीती या आमदार मंडळींना वाटते आहे. पालिका निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे खुल्या प्रभागात महिला कार्यकर्त्यांच नव्हे, तर विद्यमान नगरसेविकांनाही उमेदवारी द्यायची नाही असा निर्णय गेल्यावेळी काँग्रेसने घेतला होता. त्यामुळे नगरसेविकांचे प्रभाग खुले झाल्यानंतर त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने त्या वेळी महिला कार्यकर्त्यां आणि नगरसेविकांनी खुल्या प्रभागांमध्ये इच्छुक म्हणून अर्जही केला नव्हता. तोच नियम या वेळीही लावण्यात आल्याचे संकेत नगरसेविकांना मिळाले आहेत. त्यामुळे नगरसेविका संतापल्या आहेत. मुंबई महिला काँग्रेसने काही महिला कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी यादी सादर केली आहे. परंतु या यादीचा अद्याप विचारच झालेला नाही. कार्यक्रम, आंदोलनांसाठी महिला कार्यकर्त्यांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आदेश दिले जातात. त्यानुसार महिला कार्यकर्त्यां उपस्थितही राहतात. पण आता उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा मात्र महिला कार्यकर्त्यांना नाकारण्यात येत असल्याचा संताप व्यक्त करण्यात येतो आहे.मुंबई काँग्रेस महिला अध्यक्ष या नात्याने मी इच्छुक महिला उमेदवारांची यादी मुंबई प्रदेश अध्यक्षांना दिली आहे. मात्र आतापर्यंत त्याबाबत कोणताही निर्णय घेतल्याचे मला सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे हीच यादी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि महिला राष्ट्रीय अध्यक्षांनाही पाठवली आहे.अशी माहिती मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी दिली आहे
Post a Comment