अपात्र नगरसेवकांनी पालिकेचे थकवले १२ लाख रुपये

मुंबई : गेल्या दोन महापालिका निवडणुकांमध्ये राखीव वॉर्डातून निवडून आलेल्या व जात प्रमाणपत्रामुळे अपात्र ठरलेल्या लालजी यादव, अंजुमा फातिमा, अनुषा कोडम, जोबनपुत्रा भावना आणि इसाक शेख शेख युसूफ मोहम्मद या एकूण पाच नगरसेवकांनी पालिकेकडून विविध भत्त्यांपोटी मिळालेले ११ लाख ९८ हजार १६६ रुपये थकवल्याची माहिती उघडकीस आली आहे. इसाक शेख यांची सर्वोच्च म्हणजे सुमारे पाच लाख थकबाकी आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेच्या चिटणीस खात्याकडे नगरसेवकपद रद्द झालेल्या माजी नगरसेवकांकडून वसूल केलेल्या थकबाकीची माहिती विचारली होती. उपचिटणीस शोभना येरंडेकर यांनी गलगली यांना 'थकबाकीदार' नगरसेवकांची माहिती उपलब्ध करून दिली. २00७ ते २0१७ पर्यंत विविध राजकीय पक्षांच्या १६ नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द झाले. त्यांना नगरसेवक म्हणून मिळालेले मानधन व भत्ते परत करण्याचे पत्र चिटणीस खात्याने पाठवले होते. या १६ जणांपैकी यादव, फातिमा, अनुषा कोडम, जोबनपुत्रा भावना आणि इसाक शेख यांनी १२ लाख रकमेची थकबाकी अद्याप भरलेली नाही. लालजी यादव यांनी सात हजार ४३९ रुपये, फातिमा यांनी ४५ हजार ३८८ रुपये, कोडम यांनी तीन लाख २0 हजार ६८१ रुपये, जोबनपुत्रा यांनी तीन लाख ६५ हजार ४२८ रुपये, तर इसाक शेख यांनी तब्बल चार लाख ५९ हजार २३0 रुपये आजवर जमा करण्याचे सौजन्य दाखवलेले नाही.

'थकबाकी बुडव्या' या माजी नगरसेवकांवर पालिकेची मालमत्ता बुडवल्याबद्दल कडक कारवाई करण्याची मागणी गलगली यांनी प्रशासनाकडे केली आहे. पालिका चिटणीस यांनी जातीने लक्ष घालत वसुली करणे आवश्यक असताना फक्त जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करत आपली जबाबदारी झटकत आहेत, असा आरोपही गलगली यांनी केला आहे. थकबाकीदार माजी नगरसेवकांची नावे फोटोसहित पालिकेच्या संकेतस्थळावर तसेच संबंधित प्रभाग कार्यालयात दर्शनीभागी झळकवण्याची लेखी मागणीही त्यांनी आयुक्त अजॉय मेहता यांच्याकडे केली आहे. 'हा सर्व जनतेचा पैसा असून, या अपात्र नगरसेवकांनी तो चुकीच्या मिळवला असल्याने त्यांनी तो परत करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget