इंधन संवर्धन व बचतीसाठी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची - महेश पाठक

मुंबई : अमूल्य अशा इंधनाच्या बचतीसाठी व संवर्धनासाठी शपथ घेऊन व मानवी साखळीद्वारे संदेश देऊन कुलाब्यातील महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांनी संरक्षण क्षमता महोत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात केली. भावी पिढीसाठी इंधन मिळावे, यासाठी त्याच्या संवर्धन व बचतीसाठी जनजागृती आवश्यक असून यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी केले.
केंद्र शासनाचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, तेल उद्योगांचे राज्य समन्वयक व पेट्रोलियम संवर्धन संशोधन असोसिएशनच्यावतीने (पीसीआरए) दि. 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2017 या काळात ‘सक्षम’ (संरक्षण क्षमता महोत्सव) 2017 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पाठक यांच्या हस्ते कुलाबामधील महानगरपालिकेच्या शाळेत झाले. यामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या जनजागृती महोत्सवात सहभाग घेतला. यावेळी पीसीआरएचे विभागीय संचालक रॉय चौधरी, तेल उद्योग समन्वय समितीचे विभागीय समन्वयक बी. के. सिंग, महाराष्ट्र समन्वयक ए. एल. कृष्णन, हिंदुस्थान पेट्रोलियमचे के.श्रीनिवास, शुभांकर सेन, सिद्धार्थ पांडा, महापालिका शाळेचे मुख्याध्यापक अमरसिंह मगर आदी यावेळी उपस्थित होते.

या महोत्सवानिमित्त आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

इंधनाचे महत्त्व सांगून पाठक म्हणाले, इंधनाचा साठा हा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. तसेच तेल उत्पादक कंपन्यांनीही तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाला पुढील काळात मोठ्या प्रमाणावर इंधन तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे आतापासूनच इंधन बचत व संवर्धनासाठी जागृत होणे आवश्यक आहे. पेट्रोलियम पदार्थाचा योग्य वापर करणे तसेच सौर ऊर्जा, जैव ऊर्जा, पवन ऊर्जा आदी पर्यायी ऊर्जेचा वापरही वाढविणे आवश्यक आहे. इंधन बचत व संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन समाजात जनजागृती निर्माण करावी.

इंधन संवर्धनाबरोबरच इंधनाचा पर्यावरण पूरक वापरासाठीही समाजात जागृती निर्माण होणे आवश्यक ठरणार आहे. इंधनाच्या अतिवापरामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षण आणि इंधनाच्या निर्यातीवर होणारा अमाप खर्च टाळण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. यासाठी सक्षम महोत्सवाबरोबरच सायकल रॅली, वॉकेथॉन आदीसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget