मुंबई : शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान आणि तंत्रज्ञान अनुभवता यावेत, त्याचप्रमाणो विविध प्रयोग व प्रात्यक्षिकांच्या माध्यमांतून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, प्रोत्साहन मिळावे, यासाठी ठाणो महानगरपालिकेच्या वतीने डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्र उभारण्यात आले आहे. ठाणे मनपाचे महापौर संजय मोरे यांच्या हस्ते ५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता या केंद्राचे उद््घाटन करण्यात येणार आहे.
नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांच्या पुढाकाराने आणि चिल्ड्रेन टेक सेंटरच्या माध्यमातून ठाण्यातील कचराळी तलाव येथे डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्र सुरू करण्यात येत आहे. डॉक्टर अब्दुल कलाम कल्पकता केंद्र हा चिल्ड्रेन टेक सेंटरचा उपक्रम आहे. चिल्ड्रेन टेक सेंटर ही शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्य करणारी संस्था आहे. संगीत, नृत्य, कला जर शालेय विद्यार्थ्यांसाठी छंद असू शकतात, तर मग आजच्या एकविसाव्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञान हे विद्यार्थ्यांसाठी छंद का नसावेत? या विचाराने प्रेरित होऊन १ सप्टेंबर, २0१२ रोजी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष पुरुषोत्तम पाचपांडे यांनी चिल्ड्रेन टेक सेंटरची स्थापना केली. शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञान व तंत्रज्ञानविषयक जाणिवा समृद्ध व्हाव्यात तसेच ज्ञान-विज्ञानाच्या प्रवाहातून त्यांची बुद्धिमत्ता अधिक विकसित व्हावी, यासाठी चिल्ड्रेन टेक सेंटरमार्फत सतत नवनवीन उपक्रम राबवले जातात. संस्थेच्या या नावीन्यपूर्ण अशा उपक्रमांची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसार माध्यमांनी घेतली आहे.
Post a Comment