मुंबई - मेघी, तालुका - संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथील वडिलोपार्जित जमीन ग्रामपंचायत व तहसीलदार यांच्याकडे खोट्या नोंदी घालून हडप केल्या प्रकरणी महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी अशोक कांबळे यांनी २६ जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरु केले आहे. जो पर्यंत राज्य सरकार महसूल विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
मेघी, तालुका - संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे सर्व्हे नंबर ३९४ (ड) ३. ५३ हेक्टर हि जमीन अशोक कांबळे यांच्या आजोबांच्या नावे होती. या जमीनीपैकी १.४० हेक्टर जमीन हडप करण्यासाठी शिवसेनेचा पदाधिकारी असलेल्या श्रीपाद बेटकर यांनी राजकीय पदाचा व ओळखीचा फायदा घेत ग्रामपंचायत आणि तहसीलदार यांच्याकडे खोट्या नोंदी केल्या आहेत. या खोट्या नोंदी निदर्शनास आणूनही देवरुखचे तहसीलदार गीते यांनी कुळवहिवाटीचा दावा मंजूर केला.
अशोक कांबळे यांनी तहसीलदारांनी दिलेल्या आदेशा विरोधात कोर्टात जाण्यासाठी कागदपत्रांची मागणी केली असता तहसीलदारांनी कागदपत्रे देण्यास मुद्दाम उशीर केला. याविरोधात कांबळे यांनी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता तहसिलदार गीते यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करावी असा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. तरीही तहसीलदार गीते यांच्यावर कारवाई होत नसल्याने कांबळे यांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरु केले आहे.
Post a Comment