मुंबई (प्रतिनिधी) - रुग्णालये, दवाखाने, प्रसूतिगृहात रुग्णावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी त्वरित उपकरणे मिळावीत यासाठी त्यावर आरएफआयडी टॅग लावून त्यांचे मॅपिंग करण्यात येणार आहे. यामुळे कोणत्या रुग्णालयात किंवा दवाखान्यात कोणती वैद्यकीय उपकरणे आहेत, हे संगणकीय पद्धतीने शोध घेता येणार असल्याचे पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याद्वारे सांगण्यात आले.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये विविध जैव वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी विविध इलेक्ट्रॉनिक व संगणकीय उपकरणांचा वापर केला जातो. यामध्ये सोनोग्राफीसाठी वापरले जाणारे डॉप्लर मशीन्स, हिमोडायलाझर्स, इसीटी, इसीजी, इइजी, अल्ट्रासाऊंड उपकरणे, एक्सरे मशीन्स, सीटीस्कॅन,एमआरआय, ऍनेस्थेशिया मशीन्स यासारख्या वेगवेगळ्या ५० प्रकारच्या जैव वैद्यकीय उपकरणे आहेत. या जैव वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेची माहिती संगणकीय पद्धतीने तत्काळ उपलब्ध व्हावी, तसेच त्यांचे परिरक्षण करणे सुलभ व्हावे, यादृष्टीने या सर्व उपकरणांवर स्टीकर पद्धतीचे आरएफआयडी टॅग बसविण्यात येणार आहेत. त्यामध्ये जैव वैद्यकीय उपकरण जय रुग्णालयातील आहे त्या रुग्णालयाचे व संबंधित विभागाचे नाव, उपकरणाचे नाव, उत्पादकाचे नाव,मॉडेल, खरेदी दिनांक, किंमत, हमी कालावधी, परिरक्षण इत्यादी १५ मुद्यांचा तपशील असणार आहे. याप्रकारे तयार केलेले आरएफआयडी टॅग हे सामान्यपणे स्टीकर पद्धतीचे असल्याने ते मनपा रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांवर चिकटविता येणार आहेत. याकरिता टॅगिंग व मॅपिंग करण्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.
Post a Comment