मुंबई : भाजून गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर तात्काळ उपचार होण्यासाठी रुग्णालयातील बर्नवॉर्ड अद्ययावत करण्याबाबत लवकरच धोरण तयार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी एअर अँम्बुलन्स सुरू करण्याचा पालिकेचा विचार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी दिली.
भाजून गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी एअर अँम्बुलन्स सुरू करण्याबाबत काही नगरसेवकांनी मागणी केली होती. भाजून गंभीररीत्या जखमी झालेल्या रुग्णास तातडीने उपचार मिळावेत, यासाठी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने रुग्णास हेलिपॅडची सुविधा असलेल्या रुग्णालयात वेळेत पोहचता येईल. सध्या गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला नवी मुंबईतील ऐरोलीच्या अद्ययावत बर्न रुग्णालयात दाखल केले जाते. काळबादेवी येथील इमारत दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या अग्निशमन दलातील ३ अधिकार्यांना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र ते वाचू शकले नाहीत. मुंबईपासून हे अंतर दूर आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालय, शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयांतील बर्न वॉर्डात सुधारणा करून अद्ययावत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयात अद्ययावत बर्न रुग्णालय झाल्यास गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना नवी मुंबईत नेण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यासाठी एअर अँम्बुलन्स उपलब्ध करण्याचा पालिकेचा विचार आहे. त्यामुळे बर्न वॉर्डचे धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पालिका पाऊल टाकणार असल्याचे कुंदन यांनी सांगितले.
Post a Comment