मुंबई : शिवसेना आणि भाजपाच्या युतीसंबंधी विचारलेल्या प्रश्नांना खुबीने उत्तर देण्याचे टाळून, 'युतीची वाट बघा,' असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगत असले तरी, युतीचा निर्णय येत्या २१ जानेवारीपर्यंत होण्याची दाट शक्यता आहे. पालिकेच्या निवडणुकीसाठी २७ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून शेवटची तारीख ३ फेब्रुवारी आहे. त्यामुळेच जानेवारीच्या तिसर्या आठवड्यात युतीवर शिक्कामोर्तब होऊ शकते.
दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आपापल्या पक्षातील योग्य उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा तसेच उमेदवारी देण्यावरून पक्षात कोणीही 'बंडाचा झेंडा' फडकवू नये यासाठी पुरेपूर काळजी घेत असल्याने युतीसंबंधी कोणीही घोषणा करण्याचे सध्या टाळत आहेत, अशी माहिती उभय पक्षांतील नेत्यांनी दिली. सध्या पारदर्शक कारभार आणि विकासाच्या मुद्दय़ावर चर्चा अडली असून, युती झाल्यास कोणत्या पक्षाला किती जागा द्याव्यात, यासंबंधी अद्याप एकमताने निर्णय झाला नसताना भाजपा मात्र २२७ पैकी ११५ जागांवर लढण्यास उत्सुक आहे, असे युतीमधील एका वरिष्ठ नगरसेवकाने सांगितले. २0१४ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर ते आजवर झालेल्या कामगिरीवर आधारित भाजपाला जास्त जागा मिळाव्यात, यासाठी शिवसेनेकडे आग्रह धरण्यात येणार आहे. २0१४ मधील लोकसभा निवडणुकीत तसेच ऑक्टोबर २0१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाच्या शिवसेनेपेक्षा सर्वाधिक जागा निवडून आल्या आणि सर्वात जास्त आमदार निवडून आणणारा भाजपा राज्यातील एकमेव पक्ष सिद्ध झाला. पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही भाजपाने शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळवल्या आहे. निवडणुकीसाठी युती झाल्यास भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या पाहिजेत ही मागणी रास्त आहे, असा दावा भाजपाच्या एका पदाधिकार्याने केला. २0१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मुंबईत १५ जागा पटकावल्या. शिवसेनेच्या १४ जागा निवडून आल्या. निवडणुकीत विधानसभा मतदारसंघातून भाजपा किमान चार ते सहा उमेदवारांना सहज निवडून आणू शकेल, असा भाजपाचा होरा आहे. विधानसभा निवडणुकीतील यशानुसार युती झाल्यास १५ विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे किमान ६0 आणि शिवसेनेचे ५६ उमेदवार निवडून येऊ शकतात आणि उर्वरित १११ जागांवरही 'मोठा पक्ष' म्हणून भाजपा निर्विवाद यश मिळवेल, असाही दावा करत आहेत.
Post a Comment