आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अग्निपरीक्षा


मुंबई बुधवार ( सुनिल तफेॅ ) - देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिका सन 2017 चा निवडणुकीचा कार्यक्रम संपला असून ही निवडणूक मुंबईकरांच्या विकासावर न गाजता ती फक्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोपावर गाजली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्ये संपूर्ण निवडणूक रंगली मुंबईकरांनी आपले मत पेटीत बंद केले आहे त्यामुळे मुंबईकर आज कोणाच्या हातात पालिका सोपवणार याकडे सर्व देशांचे लक्ष लागले आहे अवघे काही तासच उरले आहेत. मुंबईच्या रणसंग्रामात शिवसेना भाजपच्या राजकीय महाभारताचे युध्द सर्वांनीच पाहिलंय. खरं तर मुंबईचा किंग कोण ? हे अधोरेखीत करणारी ही निवडणूक असल्याने, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अग्निपरीक्षा ठरणार आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असो वा मनसे, रिपाइं अथवा भारीप या राजकीय पक्षांचे आणि काही नेत्यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीतून ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्यापुढं ही निवडणूक एक आव्हान म्हणूनच उभी आहे. तसेच या निवडणुकीवर राज्यातील सत्तेची गणित अवलंबून असल्याने, नवी राजकीय दिशा देणारी ही निवडणूक ठरणार आहे. अशा अनेक अर्थाने पालिकेची निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे पालिकेत नंबर वन पक्ष कोणता राहणार आहे भाजप की शिवसेना याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे

देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेचा बजेट राज्याच्या बजेटच्या खालोखाल आहे या पालिकेत एक लाख अकरा हजार कर्मचारी काम करत आहेत ही पालिका सोन्याची कोंबडी मानली जात आहे त्यामुळे या पालिकेवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा आहे या पालिकेची सत्ता खेळण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष ताकदीने निवडणुकीला उतरत असतात यंदा या पालिकेच्या निवडणुकीत आपला पक्ष नंबर वन येण्यासाठी भाजपाने सर्व पणाला लावले आहे शिवसेना पक्षाने गेल्या वीस वर्षांचा गड सत्त्ता पुन्हा कायम राखण्यासाठी जोरदार युध्दपातळीवर प्रयत्न केले आहेत शिवसेना पक्ष पुन्हा आपला गड राखणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर संपूर्ण मुंबई पिंजून काढली आहे संयुक्त महाराष्ट्रासाठी १९६० साली १०५ मराठी बांधव, बलिदान देऊन ‘हुतात्मा’ झाले व मुंबई वाचवली. हुतात्म्यांच्या बलिदानांतून मुंबई शहर उभे राहिले हा इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे. याच मुंबईची एक हाती सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना, भाजपची राजकीय लढाई चांगलीच रंगली. राज्यातील सत्तेच्या संसारात एकत्रीतपणे नांदत असतानाही, २५ वर्षाच्या मैत्रीचा काडीमोड घेऊन एकमेकांविरोधात उभे ठाकले. नुसतं उभे ठाकले नाही तर एकमेकांची औकातही काढली. मराठी माणसांच्या हक्कासाठी लढण्यासाठी १९६६ साली शिवसेनेचा जन्म झाला आणि त्या दिवसांपासून शिवसेनेचे मुंबईवर अधिराज्य आहे. मुंबईचे आपणच राजे या गुर्मीत शिवसेना असतानाच, भाजपने शिवसेनेच्या खुर्चीखाली सुरूंग पेरण्याचे काम केलं. आणि त्यानंतर जे सुरू झालं ते आतापर्यंत काय महाभारत घडलं हे सगळयांनीच उघडया डोळयांनी पाहिलं. मुंबई हा शिवसेनेचा प्राणवायू आहे त्यामुळे मुंबईवरील शिवसेनेची पकड सैल झाल्यास शिवसेनेला मोठा हादरा बसणार आहे. त्यामुळे शिवसेना राज्याच्या सत्तेला मूठमाती देऊ शकतात, पण मुंबई पालिकेची सत्ता गेल्यास हे अपयश कधीच पचवू शकत नाही. ठाकरे घराण्याच्या राजकारणातील तिस-या पिढीतील आदित्य ठाकरेही त्याच जोमाने प्रचारात उतरल्याचे दिसून आले. त्यामुळेच ही शिवसेनेच्या नव्हे तर उध्दव ठाकरे यांच्या अस्तित्वाची लढाई बनली आहे पार्लमेंट ते महापालिका हे भाजपचे स्वप्न असल्याने मुंबई जिंकण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी ते शिवसेनेच्या विरोधात उतरले. शिवसेनेला अंगावर घेत मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी तितक्याच ताकदीने शिवसेनेचा सामना केला. नुकत्याच झालेल्या राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजपचे कमळं फुललं. त्यामुळे मुंबईसह दहा पालिकांच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला यश टिकवता येत का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात यशस्वी होतात का ? हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्रयाच्याही प्रतिष्ठेची ही लढाई बनली आहे. राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा शिवसेनेकडून दिला जातो. राजीनामा खिशात घेऊन फिरणा-या शिवसेनेच्या मंत्रयांना राजीनामा देण्याची हिंमत होत नाही अशी टीका विरोधकांकडून होत आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का, अथवा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करतात का या सगळयांची उत्तर या निवडणुकीच्या निकालानंतरच मिळणार आहेत त्यामुळे भाजप आणि मुख्यमंत्री या दोघांसाठी ही निवडणूक महत्वाची ठरली आहे.शिवसेना १९९२ साली मुंबई पालिकेतील सत्तेतून पायउतार झाली त्यानंतर आरपीआयच्या मदतीने काँग्रेसने पालिकेत सत्ता मिळवली. मात्र काँग्रेसला पुढच्या काळात या संधीचे सोनं करता आलं नाही. १९९२ साली १०९ नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेसला हे यश टिकवता आलं नाही. त्यानंतर काँग्रेसची घसरण सुरू झाली. आता काँग्रेसचे ५१ नगरसेवक आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेनंतर राज्यात आणि मुंबईतील राजकीय समिकरणं बदलली. त्यात सर्वाधिक उलथापालथ काँग्रेसमध्ये झाली. मध्यंतरी काँग्रेसमधील संजय निरूपम आणि गुरूदास कामत गटातील वाद उफाळून आला. या सगळयाचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. मुस्लिम मतदार ही काँग्रेसची हक्काची व्होट बँक समजली जाते. मात्र यंदा पहिल्यांदाच एमआयएम निवडणूक रिंगणात उतरल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत फारशी ताकद नाही. त्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत राष्ट्रवादी असणे शक्यच नाही. पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवून शरद पवारांची मुंबईत एकमेव सभा झाली. पालिका निवडणुकीचा प्रचारात पवारसाहेबांचे लक्ष हे मध्यावधी निवडणुकांकडेच लागल्याचे दिसून आले. अनेकवेळा त्यांनी बोलूनही दाखवले. राज्यातील सत्तेचा शिवसेनेने पाठींबा काढून दाखवावा असे आव्हान अनेकवेळा त्यांनी शिवसेनेला दिले. शेवटी शेवटी तर मी कोणालाही समर्थन देणार नाही हे लिहून देतो. तसंच शिवसेनेनेही लेखी स्वरुपात द्यावं, असं आव्हान त्यांनी शिवसेनेला दिलं. कुणाला कधी अंगावर घ्यायचे आणि कुणाला कधी पाठ दाखवायची, यात तरबेज नेता अशी शरद पवार यांची ओळख आहे. त्यामुळे पुढंच राजकारण काय घडतयं हेच पाहावे लागणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर जवळपास दोन वर्षानंतर राज ठाकरे पराभवाच्या पाऊल खुणा पुसण्यासाठी पालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मुंबईच्या मैदानात उतरले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उतरून मुंबईत त्यांनी अवघ्या तीन सभाच घेतल्या. अनेकांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी, पक्षाच्या बाजूने नसलेले वातावरण आणि विरोधकांकडे असलेली सत्तेची कवचकुंडले या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची लढाई महत्वाची ठरली आहे. शिवसेनेने टाळीसाठी हात झिडकारल्यानंतर मनसे स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरली आहे. आतापर्यंत मनसेला मिळालेलं जे काय यश, अपयश आहे ते स्वबळावरच मिळालं आहे. नाशिकमध्ये सत्ता मिळवल्यानंतर पाच वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा घेऊन राज मैदानात उतरले आहेत. लॅपटॉप घेऊनच राज यांनी केललं भाषण हे राजकारणातील वेगळंपणही अधोरेखीत झालं. त्याच ठाकरी भाषेत विरोधकांचाही त्यांनी समाचार घेतला. त्यामुळे नाशिक पॅटर्नचा मुंबईत किती प्रभाव पडतो हे पाहावे लागणार असले तरी मनसेसाठी ही लढाई जिकरीची बनली आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याही वर्चस्वाची लढाई आहे. आठवलेंच्या रिपाइंची भाजपशी युती झाली आहे. अवघ्या १९ जागा भाजपने त्यांना दिल्या आहेत. तर भारिपची डावे, रिपब्लिकन सेना यांच्याशी आघाडी आहे. भारिप ४९ जागांवर निवडणूक लढविली आहे. त्याशिवाय बसपा व इतर पक्षही स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरली आहे. मुंबईत दलित टक्का मतदार मोठया संख्येने आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी दलित मतांना चुचकारण्याचा प्रयोग केला. तो सफलही झालाय. दलित नेत्यांनी वेगवेगळी चूल मांडलयाने दलित मतांचे विभाजन मोठया प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे आंबेडकर आणि आठवले यांच्यासाठीही ही निवडणूक तितकीच महत्वाची ठरली आहे. मिनी विधानसभेची निवडणूक म्हणूनच मुंबई पालिकेच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. सर्वच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी मुंबईसाठी खरी लढाई शिवसेना आणि भाजप या दोघांमध्येच होणार आहे. या लढाईत कोण जिंकतंय कोण हरतंय, हा फैसला आज गुरुवारी होणार मुंबईकरांनी आपला कौल कोणाच्या बाजूने दिला आहे ते आज समजणार त्यामुळे आजच्या निकालावर सर्व राजकीय पक्षासह सर्व उमेदवारांचे काळीज धडधडत निकालानिकालाला काही तास शिल्लक राहीले आहेत मात्र आजच्या या निकालावरच राज्याच्या राजकारणाची मोठी नवी दिशा ठरणार आहे हे जवळपास निश्चित आहे

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget