‘मालवणी भाषेला सातासमुद्रापार नेण्यामध्ये वस्त्रहरण नाटकाची महत्वपूर्ण भूमिका’ - गंगाराम गवाणकर

मराठी भाषेवर नितांत प्रेम करा, दैनंदिन जीवनात मराठीचा उपयोग कराः महापौरमुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – बोलीभाषेचा गोडवा हा अविट असून कोकणातील मालवणी भाषेला सातासमुद्रापार नेण्यामध्ये माझ्या वस्त्रहरण नाटकाची महत्वपूर्ण भूमिका असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक व नाटय कलावंत तसेच यंदाच्या नाटय संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी केले.तर, हसण्यासारखे औषध जगात कुठेही शोधून आढळणार नाही. भाषा आणि साहित्यामध्ये विनोदांचे स्थान अढळ आहे, असे सांगून मराठी भाषेवर नितांत प्रेम करा, तिचा मान राखा आणि दैनंदिन जीवनात मराठीचाच कटाक्षाने उपयोग करावा, असे आवाहन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.
पालिकेच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा पंधरवडा – २०१७’ चा शुभारंभ मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयातीलपालिका सभागृहात झाला, त्यावेळी मराठी भाषेतील नाटयसंपदा या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून गंगाराम गवाणकर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन महापौर स्नेहल आंबेकर बोलत होत्या.

महापौर स्नेहल आंबेकर मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या की, मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला असला तरी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. कारण मराठी भाषेचा वारसा हा प्राचीन आहे. भाषा आणि संस्कृतीची स्पंदने आपल्या मनात उमटत असतात, त्याला विचाराचे स्वरुप प्राप्त होते. अन्य भाषा शिकायला हरकत नाही, पण मातृभाषेमध्ये आपण पारंगत व समृद्ध असलेच पाहिजे, असे महापौरांनी नमूद केले. मराठी साहित्याला विविध लेखक, कवींनी समृद्ध केले. मराठी साहित्यात विनोदी लेखन हा अविभाज्य घटक आहे. ज्याला मनमोकळे हसता येते, तो खरा सुदैवी, असे सांगून मातृभाषा मराठी भाषेवर सर्वांनी भरभरुन प्रेम करावे, तिचा मान राखावा, असे आवाहनही महापौरांनी अखेरीस केले. 

प्रमुख वक्ते गंगाराम गवाणकर यांनी मार्गदर्शन करताना पु.ल.देशपांडे यांचा एक किस्सा याप्रसंगी सांगितला. पु.ल.देशपांडे यांनी पुण्याला जेव्हा वस्त्रहरण नाटक बघितले तेव्हा हे नाटक मला पुन्हा पुन्हा बघायला तर आवडेल पण त्यापेक्षाही एखादी छोटी भूमिका मला या नाटकात करता आली तर ते अधिक बरे होईल असे लिखीत पत्र आपल्याला पाठविल्याची नोंद मी माझ्या आत्मचरित्रात घेतली असल्याची माहिती गंगाराम गवाणकर यांनी यावेळी दिली. त्यासोबतच वस्त्रहरण नाटकाची संपूर्ण टीम नाटकाचा प्रयोग लंडन येथे सादर करण्यासाठी विमानाने जात असताना विमानात घडलेल्या प्रसंगाचे खुमासदार वर्णन गंगाराम गवाणकर यांनी यावेळी आपल्या भाषणातून केले.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget