मुंबई, गुरुवार (प्रतिनिधी) - शिवसेना सोडून जाण्याचे सत्र अजून सुरूच आहे पालिकेची आगामी निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाच शिवसेनेमध्ये धरपकड सुरु आहे. मुंबईतील शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या लालबाग परळमधील शिवसेनेचे नगरसेवक नाना आंबोळे यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला, यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला आहे. तर शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबईतील महत्वाच्या लालबाग - परळ परिसर हा मराठी माणसांचे हक्काचे ठिकाण म्हणून ओळखला जातो. हा शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला म्हणूनही त्याची ओळख आहे. वॉर्ड क्र. १९८ मधून नाना अंबोले हे नगरसेवक म्हणून निवडून आले. नाना हे सेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक नेते ओळखले जात असल्याने या परिसरात त्यांची मोठी ताकत आहे. आंबोले हे सेनेच्या तिकीटावर दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. त्यांनी बेस्ट समितीचे अध्यक्षपदही भुषविले होते. यंदाच्या निवडणुकीत त्यांचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाल्याने आंबोले यांनी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचा आग्रह धरला होता. परंतु स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी या जागेसाठी पक्षातील एका महिला पदाधिकाऱ्यांचे नाव पुढे केल्याने आंबोले संतप्त झाले होते. त्यासाठी बुधवारी रात्री एबी फॉर्मचे वाटप सुरु असताना नाना अंबोले मातोश्रीवर जाऊन आल्याचेही सांगितले जाते. मात्र, त्यांच्या पत्नीला उमेदवार मिळण्याची शक्यता मावळल्याने अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचा मात्तब्बर नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याने शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. महापालिकेच्या एफ साऊथ या प्रभागात नायगाव भोईवाडा परळ शिवडी आणि लालबाग हा सगळा परिसर मोडतो. याठिकाणी ९० टक्के मराठी टक्का मतदारांची वस्ती आहे. इथला मतदार नेहमीच शिवसेनेच्या बाजूने राहिला आहे. त्यामुळे हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेचा हा बालेकिल्ला तोडण्यासाठी भाजपने अगोदर पासूनच फिल्डिंग लावली होती. त्यांत आंबोले याना फोडण्यात भाजप नेत्यांना यश आलं आहे. त्यामुळे या परिसरातील यापुढील शिवसेना भाजपची लढाई चांगलीच रंगतदार होणार आहे.
Post a Comment