पालिका महापौर पदासाठी भाजप देणार मराठी चेहरा

मात्र नाव गुलदस्त्यात; गटनेतेपदी मनोज कोटक मुंबई, शुक्रवार (प्रतिनिधी)- देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेच्या महापौर पदासाठी भाजपने ही मराठी चेहरा देण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र कोणाचे नाव पुढे करणार हे गुलदस्त्यात आहे. आज अचानक मनोज कोटक यांची गटनेते पदी वर्णी लावत त्यांना महापौराच्या स्पर्धेतून बाहेर ठेवण्यात आले. यामुळे गुजराती महापौराच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे महापौर पदासाठी भाजपतर्फे कोणाचे नाव जाहीर होते, याबाबत राजकीय वर्तूळात उत्सुकता लागून राहील आहे.
मुंबई पालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी मानली जात आहे पालिकेची सन २०१२ च्या निवडणुकीनंतर दिलीप पटेल यांची भाजपच्या गटनेतेपदी निवडणूक करण्यात आली होती. मात्र दोन वर्षानंतर दिलीप पटेल यांना बाजूला करून मनोज कोटक यांच्या गळ्यात गटनेत्यांची माळ टाकली. सलग तीन वर्षे गटनेते पदाची यशस्वीरीत्या धुरा सांभाळली. परंतु, भाजपाकडे दुसरा गटनेते पदाची जबाबदारी सांभाळणारा दुसरा नेता नसल्याने कोटक यांच्याच नावावर पुन्हा शिक्कामोर्तब करावे लागले. कोटक गटनेते झाल्याने त्यांच्या हातून स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर अशी दोन्ही महत्वाची पदे गेल्याची चर्चा पालिका गोटात वर्तवली जात आहे. दरम्यान, भाजपकडून महापौरपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून मनोज कोटक, डॉ. राम बारोट, प्रकाश गंगाधरे आणि प्रभाकर शिंदे यांची नावे आघाडीवर होती. परंतू, येणाऱ्या महापौरांच्या कारकिर्दीत विधानसभेची निवडणूक होणार असून महापौर पदासाठी गुजराती चेहरा देणे भाजपला डोईजड होईल, या भितीने भाजपने महापौर पदासाठी मराठी चेहरा देण्याची खेळी खेळली आहे. यामुळे महापौर स्पर्धेतून कोटक यांच्याबरोबर बारोट यांचेही नाव मागे पडल्याने प्रकाश गंगाधरे व प्रभाकर शिंदे दोघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. प्रभाकर शिंदे हे नुकतेच शिवसेनेतून भाजपमध्ये आल्याने त्यांच्या नावाला पक्षातून विरोध आहे. मात्र, शिंदे हे चांगले वक्ते आणि अभ्यासू नगरसेवक असल्याने त्यांच्यात शिवसेनेविरोधात दोन हात करण्याची ताकद आहे. तर गंगाधरे यांनी सलग दोनवेळा सुधार समितीचे अध्यक्षपद भुषविल्याने महापालिकेत त्यांचा अनुभव दांडगा असल्याने महापौर पदासाठी सध्या तरी त्यांचेच पारडे जड आहे. भाजपने मात्र अद्याप तरी अधिकृत घोषणा केलेली नाही.

भाजपची ८४ गटाची नोंदणीपालिकेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेला नाही. यावेळेस ५ अपक्ष निवडून आले आहेत. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने ४ अपक्षांच्या पाठिंब्याने ८८ संख्याबळ आलेला गट कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केला होता. शुक्रवारी अपक्ष नगरसेविका मुमताज खान आणि अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. यामुळे दोन अपक्षांच्या पाठिंब्यावर ८४ संख्याबळ गटाची नोंदणी भाजपने कोकण विभागिय आयुक्तांकडे केली आहे.

महापौर पदाचे उद्या अर्ज भरणार महापालिकेच्या सत्तेसाठी शिवसेना- भाजप २०० टक्के एकत्र येणार अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे. असे असले तरी उद्या ४ मार्च रोजी महापौर पदासाठी दोन्ही पक्ष वेगवेगळे अर्ज भरणार आहेत. महापौर पदाची निवडणूक ८ मार्चला होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मंगेश सातमकर व आशिष चेंबूरकर, भाजपकडून प्रकाश गंगाधरेंचे नाव चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादीकडून राखी जाधव आणि कॉंग्रेसकडून रवी राजा हे अर्ज भरणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप तरी कोणत्याही पक्षाने अधिकृत महापौर उमेदवारांचे नाव घोषीत केलेले नाही.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget