मुंबईतील मोठ्या नाल्यांच्या सफाईची कामे १ एप्रिलपासून तर लहान

नाल्यांच्या सफाईची कामे ७ एप्रिलपासून सुरू होणार
कामे ठरलेल्या वेळेत व गुणवत्तापूर्ण व्हावीत, आयुक्तांच्या सूचना

मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पालिका क्षेत्रातील मोठ्या नाल्यांच्या सफाई कामांची निविदा प्र॑क्रिया आता अंतिम टप्प्यात असून ही कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार १ एप्रिल २०१७ पासून सुरु करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आढावा बैठकीत दिले. तसेच छोट्या नाल्यांच्या निविदा प्रक्रियेस कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने ही कामे गेल्यावर्षीप्रमाणेच विभाग स्तरावर व स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांच्या मदतीने ७ एप्रिलपासून सुरु करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व ७ परिमंडळांचे उपायुक्त आणि २४ प्रशासकीय विभागांचे सहाय्यक आयुक्त यांनी नालेसफाई संबंधीच्या सर्व कामांची पाहणी काळजीपूर्वक करावी आणि ही सर्व कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसारच गुणवत्तापूर्णरित्या होतील, याची खबरदारी घ्यावी अशा सूचनाही सर्व अधिका-यांना दिल्या आहेत.

पावसाळ्यापूर्वी मोठ्या व छोट्या नाल्यांच्या सफाईची कामे महापालिकेद्वारे केली जाते. मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी महानगरपालिकेच्या पर्जन्यजल वाहिन्या खात्याद्वारे निविदा प्रक्रिया राबवण्यात येते. मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी ३० गटांनुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. यापैकी २४ गटातील मोठ्या नाल्यांच्या सफाईचे कार्यादेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. तर उर्वरित ६ गटांची निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून त्याबाबतचेही कार्यादेश यशस्वी निविदाकारास लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिका-याने दिली. छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी ४ वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र, या निविदा प्रक्रियेस प्रतिसाद न मिळाल्याने छोट्या नाल्यांची सफाई ही गेल्यावर्षी प्रमाणेच विभाग स्तरावर स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांच्या मदतीने करण्यात येणार आहेत.

पावसाळापूर्व आरोग्यविषयक खबरदारीच्या सूचना-
पावसाळ्यादरम्यान जलजन्य व कीटकजन्य आजारांची संभाव्यता लक्षात घेता महापालिकेच्या स्तरावरील आवश्यक ती सर्व कार्यवाही काटेकोरपणे करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य खात्याला देण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या संस्थांच्या मालकीच्या जमिनी वा इमारती आहेत. या इमारतींमध्येही आवश्यक ती सर्व काळजी घेतली जावी, विशेष करुन या परिसरांमध्ये पाणी साचणार नाही याचीही दक्षता प्रभावीपणे घेतली जावी, यासाठी सर्व संबंधित संस्थांना पत्र द्यावे. संबंधित संस्थांनी आवश्यक ती कार्यवाही केली नाही, तर त्या संस्थेच्या सर्वेाच्च पदावरील व्यक्तीवर संबंधित नियमांन्वये कारवाई करण्याचेही आदेश बैठकीदरम्यान दिले आहेत.

खाद्य, पेय पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश--
खाद्यपदार्थ, पेयपदार्थ विक्रेते यांच्या कडील पदार्थ, बर्फ, पाणी इत्यादींची नमूना चाचणी नियमीतपणे करावी, तसेच चाचणी मध्ये अयोग्य ठरणा-या नमुन्यांबाबत त्वरीत व कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही यापूर्वी देण्यात आले आहेत.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget