जोगेश्‍वरी येथील उंच भागात पाण्याचा टाक्या बसवा - रविंद्र वायकर

मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील उंच भागांमध्ये कमी दाबाने होणार्‍या पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी येथे पाण्याच्या टाक्या बसविण्यात याव्यात, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुंबई पालिकेच्या जलअभियंतांना दिले.

जोगेश्‍वरी परिसरात काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावत असल्याने राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पालिकेच्या जल अभियंत्यांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मुंबई पालिकेचे मुख्य जलअभियंता अशोक कुमार तवाडीया, उप जलअभियंता राठोड, सहाय्यक जलअभियंता साळुंके, सुधार समिती अध्यक्ष बाळा नर तसेच रहिवासी उपस्थित होते. बैठकीत रहिवाशांनी विभागात होणार्‍या अपुर्‍या पाणी पुरवठ्याचा पाढा महापालिका अभियंतासमोर वाचला. डोंगरावरील झोपडपट्‌ट्या असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी रहिवाशांनी अभियंतांकडे केल्या. विभागामध्ये पालिकेने दोन टँकर खरेदी करुन त्याद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणीही रहिवाशांनी यावेळी केली. कमी दाबाने होणार्‍या पाणी पुरवठ्यामुळे उंच भागात पुरेसा पाणी पुरवठा होत नाही तेथे पाण्याच्या टाक्या बसविण्यात याव्यात तसेच ज्या ज्या भागांमध्ये गळती आहे, त्याचा शोध घेऊन तात्काळ दुरुस्ती करुन गळती बंद करावी, असे निर्देश वायकर यांनी जलअभियंत्यांना दिले. 

वेरावली हा जलाशय जिर्ण झाल्याने त्याची तात्काळ दुरुस्ती व त्यासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद करण्यात यावी. शिवटेकडी हा भाग उंचावर असल्याने येथील अनेक ठिकाणी अपुरा पाणी पुरवठा होतो. त्यामुळे येथे जास्त क्षमतेचा पंप बसविण्यात यावा, असे निर्देशही वायकर यांनी जलअभियंता तवाडीया यांना दिले.
‘टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक वेबसाईट तयार केली आहे. ज्या भागाना कमी पाणी पुरवठा होत असेल तेथील जनतेने आपली तक्रार या वेबसाईटवर नोंदविल्यास, त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे तवाडिया यांनी सांगितले’. ज्या उंच भागात राहणार्‍या रहिवाशांना होणार्‍या अपुर्‍या पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न दूर करण्यासाठी अशा भागातील किमान १५० सभासदांनी एकत्र येऊन पाण्याच्या कनेक्शनसाठी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज केल्यास अशांना पालिकेतर्फे पाण्याची टाकी बांधून देण्यात येईल, असे आश्‍वासनही तवाडीया यांनी दिले. सध्या शिवटेकडी येथे ४० हॉर्स पॉवर क्षमतेच्या पंपाच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु आता येथे ५० हॉर्स पॉवर क्षमतेचा पंप बसविण्यात येणार असल्याने येथील पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल, अशी माहिती तवाडीया यांनी यावेळी दिली.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget