रस्ते व चर खोदाईची कामे १ ऑक्टोबर पासून करता येणार
परवानगी प्राप्त, पण काम सुरु झाले नसल्यास त्या परवानग्या स्थगित
मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – विविध उपयोगितांची परिरक्षण कामे, केबल टाकणे किंवा इतर संबंधित कामांसाठी पालिकेद्वारे रस्ते , पदपथ इत्यादींवर चर खोदाई करण्याच्या परवानग्या दिल्या जातात. मात्र येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्रास होऊ नये, यादृष्टीने सध्या जी कामे सुरु आहेत, ती १९ मे पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. त्याचबरोबर ज्या कामांबाबत परवानगी देण्यात आली आहे, मात्र अद्याप काम सुरु झालेले नाही, त्या परवानग्या स्थगित करण्यात आल्या असून आता त्यांना १ ऑक्टोबर २०१७ पासून काम सुरु करता येऊ शकेल.
रस्ते , पदपथ इत्यादींवर चर खोदाई करण्याबाबत यापूर्वी देण्यात आलेल्या परवानग्यांनुसार सध्या जी कामे सुरु आहेत, ती सर्व कामे येत्या शुक्रवारपर्यंत १९ मे पर्यंत पूर्ण करुन रस्ता वाहनयोग्य व पदपथ पूर्ववत करण्याचे आदेश संबंधित उपयोगिता देणा-या संस्थांना देण्यात आले आहेत.त्याचबरोबर यापूर्वी देण्यात आलेल्या परवानग्यांबाबत अद्याप काम सुरु झाले नसल्यास, अशा सर्व परवानग्या पालिका प्रशासनाद्वारे ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. यापूर्वी परवानगी मिळाली असल्यास, पण अद्याप काम सुरु झाले नसल्यास; अशी कामे ३० सप्टेंबर नंतरच करावयाची आहेत अशीही माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे
Post a Comment