पालिका क्षेत्रात १ लाख २० हजार किलो बर्फ जप्त करुन नष्ट


एम/पूर्व, आर/दक्षिण व 'इ' विभागामध्ये प्रत्येकी १० हजार किलो पेक्षा अधिक बर्फ नष्ट
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महापालिकेची धडक कारवाई
मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान पालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांकडील सरासरी ७५ टक्के बर्फ नमुन्यांमध्ये इ-कोलाय जीवाणू आढळून आले होते. तसेच एप्रिल महिन्यात पालिका क्षेत्रातील काही भागात अतिसाराचे रुग्ण देखील आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर अनधिकृत फेरीवाले ,सरबत विक्रेते , खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावरील कारवाई यापूर्वीच अधिक तीव्र करण्यात आली आहे. यानुसार गेल्या काही दिवसात सर्व २४ विभागांमध्ये सुमारे १ लाख २० हजार किलो बर्फ जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

या कारवाई दरम्यान पालिकेच्या 'एम पूर्व' विभागात सर्वाधिक १८ हजार ५०० किलो एवढा बर्फ जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे. एम पूर्व विभागामध्ये गोवंडी, देवनार, मानखुर्द, तुर्भे , शिवाजी नगर, भारत नगर, गणेश नगर, सह्याद्री नगर, अयोध्या नगर, गौतम नगर, विष्णू नगर इत्यादी परिसरांचा समावेश आहे या खालोखाल पालिकेच्या 'आर दक्षिण' विभागामध्ये सुमारे ११ हजार किलो बर्फ जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे. आर दक्षिण विभागामध्ये कांदिवली, पोयसर, समता नगर, आकुर्ली, राम नगर, महाराष्ट्र नगर, चारकोप इत्यादी परिसरांचा समावेश होतो. तर पालिकेच्या 'इ' विभागामध्ये सुमारे १० हजार ८०० किलो बर्फ जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे. पालिकेच्या 'इ' विभागामध्ये भायखळा, चिंचपोकळी, डॉकयार्ड रोड, रे रोड, शिवडी, लकडी बंदर, भंडारवाडा, नागपाडा, आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल इत्यादी परिसरांचा समावेश होतो.पालिकेच्या सर्व २४ विभागात जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे
पालिकेचे आवाहनपालिका क्षेत्रातील बर्फ व पाणी नमून्यांमध्ये आढळून आलेले इ-कोलाय जीवणूंचे प्रमाण लक्षात घेता रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाऊ नये, बाहेरील पाणी - सरबत – उसाचा / फळांचा रस इत्यादी पिणे टाळावे, तसेच पाणीपुरी - भेळपुरी सारखे पदार्थ खाणेही टाळावे असे आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आले आहे.

डॉक्टरांचा सल्ला घ्याप्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जेवणापूर्वी व अन्न शिजवताना, तसेच शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत; घरी शिजवलेले ताजे अन्न खावे, हिरव्या पालेभाज्या - फळे स्वच्छ धुऊन खावेत, तसेच वैयक्तिक स्वच्छता काटेकोरपणे राखण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. मळमळ, उलटी, जुलाब यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी सूचना डॉ. पद्मजा केसकर यांनी केली आहे.





Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget