महासमुंद (छत्तीसगढ) : छत्तीसगढ राज्यातील महासमुंद जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात जिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ती युवती परतल्यामुळे सध्या चर्चा होत आहे. तिच्या मृत्यूचा धक्का बसलेल्या तिच्या कुटुंबियांना तिचे परतणे चमत्कारापेक्षा कमी नाही. त्याचवेळी पोलिसांना आता हे शोधायचे आहे की, जिच्यावर अंत्यसंस्कार केले गेले ती मुलगी कोण होती? अंत्यसंस्कारासोबत त्या दिवंगत मुलीशी संबंधित सगळे पुरावेच नष्ट झाले आहेत.
ती युवती १७ एप्रिल रोजी कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेली होती. शोध घेऊनही ती न सापडल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. हे प्रकरण आहे ते महासमुंद जिल्ह्यातील बागबाहरातील तेंदूलोथा गावातील. १९ मे रोजी भालुचुवां कंडीझरमध्ये अज्ञात युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. दुसऱ्या दिवशी तेंदूलोथातील एका कुटुंबाने ही युवती आमचीच असल्याची ओळख पटवून तिच्यावर अंत्यसंस्कारही केले. २३ मे रोजी या कुटुंबाला आपली मुलगी जिवंत असल्याची माहिती समजली. रायपूर येथे वास्तव्यास असलेल्या मुलीच्या मामे भावाला मिळालेली ही माहिती कुटुंबियांनी पोलिसांना सांगितली. पोलिस त्या मुलीला मंगळवारी बागबाहरा ठाण्यात घेऊन आले. बागबाहराच्या टीआय शशिकला उइके यांनी सांगितले की, १९ मे रोजी भालुचुवा कंडीझरमध्ये सापडलेला अज्ञात युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह तेंदूलोथाच्या कुटुंबियांनी ती आमची मुलगी असल्याचे ओळखले होते. त्यानंतर पोलिसांनी तो मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला.
पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीला रायपूरमध्ये ताब्यात घेण्यात आले. स्वत: तिनेच सांगितल्याप्रमाणे आई रागावल्यामुळे ती घर सोडून कांटाबाजी येथे गेली होती. तेथे १५ दिवस राहून रायपूरमध्ये दुकानात काम करू लागली होती. प्रसारमाध्यमांत तिने स्वत:च्या मृत्यूची बातमी वाचली तेव्हा ती तिच्या मावशीकडे होती.
Post a Comment