गेल्यावर्षी 'मे' च्या चौथ्या आठवड्यात झाली होती ७२.१३ टक्के नालेसफाई
नालेसफाईची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणारमुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – पालिकेद्वारे पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नालेसफाईची कामे वेगात सुरु असून मे च्या चौथ्या आठवड्याच्या अखेरीस मोठ्या नाल्यांच्या सफाईची कामे ८६.८७ टक्के एवढी पूर्ण झाली आहेत. गेल्यावर्षी हेच प्रमाण ७२.१३ टक्के एवढे होते. छोट्या नाल्यांचीही कामे विभाग स्तरावर ठरलेल्या वेळापत्रकानुसार व्यवस्थितपणे सुरु आहेत. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी ठरल्यानुसार पूर्ण होतील, अशी माहिती पालिकेच्या अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे प्रभारी संचालक प्रकाश कदम यांनी दिली आहे.
मुंबई पालिका क्षेत्रातील मोठ्या नाल्यांच्या सफाईद्वारे १ लाख ९१ हजार ६८२ मेट्रीक टन एवढा गाळ येत्या पावसाळ्यापूर्वी हटविणे अपेक्षित आहे. यापैकी २७ मे पर्यंत सुमारे १ लाख ६६ हजार ५२२ टन गाळ काढून व वाहून नेण्यात आला आहे २७ मे पर्यंत नालेसफाईची कामे ८६.८७ टक्के एवढी झाली आहे गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी एकूण १ लाख ८९ हजार १४४ मेट्रीक टन एवढा गाळ काढून व वाहून न्यावयाचा होता. यापैकी गेल्यावर्षी 'मे' च्या चौथ्या आठवड्याच्या अखेरपर्यंत मोठ्या नाल्यांमधून सुमारे १ लाख ३६ हजार ४३८ मेट्रीक टन एवढा गाळ काढून व वाहून नेण्यात आला होता; गेल्यावर्षी हे प्रमाण ७२.१३ टक्के एवढे होते. मे च्या चौथ्या आठवड्याच्या अखेरपर्यंतपालिका क्षेत्रातील शहर विभागातील मोठ्या नाल्यांमधून १३ हजार ७२८ मेट्रीक टन (८०.६८ टक्के) एवढा गाळ काढून व वाहून नेण्यात आला आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण ५९.७८ टक्के एवढे होते. यावर्षी पश्चिम उपनगरांमध्ये ९२ हजार ९२० मेट्रीक टन (८२.०८ टक्के); तर पूर्व उपनगरांमध्ये ५९ हजार ८७४ मेट्रीक टन (९७.४३ टक्के) एवढा गाळ काढून व वाहून नेण्यात आला आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण पश्चिम उपनगरांमध्ये ८४.३४ टक्के; तर पूर्व उपगनरांमध्ये ६८.६१ टक्के एवढे होते. तसेच मिठी नदीमधील गाळ काढून व वाहून नेण्याचे काम देखील प्रगती पथावर असून २७ मे २०१७ पर्यंत ८०.४९ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशीही माहिती प्रकाश कदम यांनी दिली आहे.
छोट्या नाल्यांच्या व रस्त्यालगतच्या वाहिन्यांच्या सफाईची कामे विभाग स्तरावर केली जात असून ती स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने केली जात आहेत. छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी ३ लाख ७० हजार ९५४ मनुष्य दिवसांचा तर रस्त्यालगतच्या वाहिन्यांच्या सफाईसाठी २ लाख ४१ हजार ५४६ मनुष्य दिवसांचा वापर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही कामे करताना गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्यदिवसांची उपलब्धता स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. ही कामे देखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील या गतीने प्रगतीपथावर आहेत असेही कदम यांनी सांगितले
Post a Comment