अचानक पाऊस पडल्यास परिसर होणार जलमय
मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेने मुंबईतील नाले सफाईचे काम सुरू केले असून 78 टक्के नाले सफाई झाल्याचा दावा केला असला तरी मुंबईतील काही रेल्वे ट्रॅक जवळचे नाले हे गाळातच बुडालेले आहेत मुलुंड रेल्वे स्थानकाजवळच्या नाले सफाईचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अचानक पाऊस कोसळल्यास येथे पाणी तुंबण्याची मोठी शक्यता आहे. 2005 साली पडलेल्या मुसळधार पावसांत हा नाला तुंबल्याने रेल्वे परिसर जलमय झाला होता. त्यामुळे पावसापूर्वी या नाल्याची सफाई पूर्ण करावी अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जाते आहे.2005 साली मुसळधार पडलेल्या पावसांत मुलुंड रेल्वे स्थानक परिसरातील नाला तुंबून येथील परिसर जलमय झाला होता. थोड्या पावसांतही जलमय होणारा हा नाला पालिका आणि रेल्वे यांच्यात समन्वय नसल्याने नाल्यातील गाळ जैसे थे असल्याची तक्रार या परिसरातील रहिवाशांची आहे. मुलुंड पूर्वेकडील हा नानेपाड़ा नाला मुलुंड मधील सर्वात मोठा नाला आहे. जवळजवळ सात ते आठ झोपड़पट्टीच्या बाजूने वाहत येऊन पुढे रेल्वे ट्रक खालुन ऐरोलीच्या खाड़ीला जाऊन मिळतो. 2005 साली पडलेल्या मुसळधार पावसांत मुंबई पाण्याखाली गेली होती तेव्हा मध्य रेल्वे बंद होण्यास हाच नाला कारणीभूत ठरला होता. दरवर्षी या नाल्यातील काही भागातील गाळ पालिका तर काही रेल्वे काढ़ते. पण हा गाळ वरवरचा काढला जात असल्याने, पावसांत हा गाळ पाण्यासोबत रेल्वे रुळावर येऊन पाणी साचते व मुंबईची लाईफलाईन ठप्प होते. नाल्यातील गाळ काढला नाही तर थोड्या पावसांतही येथे पाणी साचण्याची घटना घडते. रेल्वे, पालिकेकडून गाळ काढण्याचे काम सुरू असले तरी 31 मे पर्यंत हे काम पूर्ण होणे कठीण आहे. हा मोठा नाला असल्याने येथे कचरा टाकण्याचे प्रमाण मोठे आहे. नाल्याच्या दोन्ही बाजूला कचरा टाकला जातो. शिवाय काढलेला गाळ वेळेत उचलला जात नसल्याने हा गाळ पुन्हा नाल्यात जातो. थोड्या पावसांतही तुंबणारा हा नाला कधी साफ होणार असा सवाल येथील नागरिकांकडून केला जातो आहे.
Post a Comment