नवी दिल्ली : संतुलित आक्रमणाच्या बळावर भारतीय संघ यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपदाचा प्रबळ दावेदार ठरतो, असे मत महान फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ‘माझ्या मते भारत आणि आॅस्ट्रेलिया हे जेतेपदाचे प्रबळ दावेदार संघ आहेत. हे दोन संघ अंतिम फेरीत दाखल व्हायला हवेत. भारतीय संघात सहा तज्ज्ञ गोलंदाज असल्यामुळे संतुलित मारा आहे. रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा हे २०१३च्या स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करीत भारताला जेतेपद मिळवून देऊ शकतात.’ जडेजाने त्या वेळी १२, तर आश्विनने ८ गडी बाद केले होते.
मी कुलदीप यादव यालादेखील संघात पाहू इच्छित होतो. पण, इंग्लंडमध्ये वेगवान माऱ्याची अधिक गरज असल्याचे निवडकर्त्यांना वाटले असावे. त्यामुळे यादवला संघात स्थान मिळाले नसावे. फिरकी गोलंदाजांची २० षटके सामन्यात निर्णायक ठरणार असून, फिरकी गोलंदाजांनी मधल्या टप्प्यात धावा रोखून गडी बाद करायला हवेत. १५ पैकी ९ जण २०१३ च्या विजेत्या संघात होते. हा सर्वांत संतुलित संघ असल्याने चॅम्पियन्सचे जेतेपद कायम राखण्यात मला तरी शंका वाटत नाही, असा विश्वास प्रसन्ना यांनी व्यक्त केला.
‘चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयासाठी कटिबद्ध’लंडन : आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ याने मान्य केले की, क्रिकेट आॅस्ट्रेलियासोबत मानधनाच्या मुद्द्यावरून खेळाडूंचे लक्ष विचलीत झाले आहे. मात्र आता हे प्रकरण मागे टाकून चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा पटकावण्यासाठी ते कटीबद्ध आहे. या वादाचा खेळाडूंवर किती परिणाम झाला, यावर स्मिथ म्हणाला की,‘मी आता माझ्या कामावर लक्ष देणार अहे. मी ज्या पदावर आहे तेथे चांगले खेळणे हे माझे काम आहे. मी प्रत्येक आव्हानासाठी तयार आहे. हा खेळाडूच्या आयुष्याचा भाग असतो.’’
चॅम्पियन्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करू: मुर्तझाडब्लिन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यात न्यूझीलंडवर ५ गड्यांनी मिळालेल्या विजयामुळे संघाचे मनोधैर्य उंचावले आहे. या स्पर्धेत बांगलादेशाला चांगल्या कामगिरीची आशा असल्याचे या संघाचा कर्णधार मुशर्रफ मुर्तझा याचे मत आहे. सराव सामन्यातील खेळपट्ट्यांपासून आम्हाला बरेच काही शिकता येईल. अद्याप आमचा एक सराव सामना शिल्लक आहे. भारत आणि पाकविरुद्धच्या सामन्यातूनही बराच बोध घेता येईल. न्यूझीलंडविरुद्धचा सामना कठीण होता, तो आम्ही जिंकला. यामुळे आत्मविश्वास बळावला आहे. आमच्यासाठी पुढील दोन्ही सामने मोठे असल्याचे मुर्तझा म्हणाला.
Post a Comment