मुंबई, (प्रतिनिधी) - गेल्या अनेक वर्षांनंतर भाजपाचे सरकार आले या भाजप सरकारला २६ मार्च रोजी सत्तेवर येऊन ३ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास भाजप सरकार अपयशी ठरले आहे. याच्याच निषेधार्थ भाजप विरोधात काँग्रेसतर्फे आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली
भाजपा प्रणित केंद्र सरकारला आज २६ मे रोजी ३ वर्षे पूर्ण होत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास हे सरकार संपूर्णतः अपयशी ठरलेले आहे. तसेच भारताच्या सीमेवरील परकीय आक्रमणामुळे शेकडो जवान शहीद झाले आहेत. देशातील वाढता दहशतवाद, सरकार समर्थकांनी भावनिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, असहिष्णुता उच्छांद मांडला आहे. युवक, महिला, शेतकरी, छोटे उद्योजक, नोकरदारांचा भ्रमनिरास झाला आहे. मोठमोठ्या उद्योगपतींना देशाची आर्थिक व्यवस्था आंदण दिली असल्याचा आरोप निरुपम यांनी यावेळी केला आहे. तसेच, भाजपा सरकारचा नाकर्तेपणा, ढिसाळ कायदा व्यवस्था, जनसामान्यांची आर्थिक कोंडी, अपरिपक्व संरक्षण धोरण व प्रशासन ह्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनाला माजी केंद्रिय मंत्री आर. एन. पी. सिंग, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसअध्यक्ष संजय निरुपम तसेच सर्व आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनादरम्यान आझाद मैदानात काँग्रेसतर्फे फोटो प्रदर्शन उभे करण्यात येणार आहे. त्यामध्ये भाजपा सरकारच्या ३ वर्षाच्या कालावधीत जेवढे गुन्हे व अत्याचार झाले. सामान्य जनता, दलित व शेतकऱ्यांवर लाठीमार झाले, अशा फोटोंचे हे प्रदर्शन असणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.
Post a Comment