३ हजार ३४५ फेरीवाल्यांवर महापालिकेची धडक कारवाई

फेरीवाल्यांकडील फळे, भाज्या, अन्नपदार्थ, सरबत इत्यादी जप्त व नष्ट
आतापर्यंत १ लाख ७० हजार किलो बर्फही केला जप्त करुन नष्ट
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांकडील सरासरी ७५ टक्के बर्फ नमुन्यांमध्ये इ-कोलाय जीवाणू आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत फेरीवाले , सरबत विक्रेते , खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावरील कारवाई यापूर्वीच अधिक तीव्र करण्यात आली आहे. यानुसार १ ते १५ मे या कालावधीदरम्यान ३ हजार ३४५ फेरीवाल्यांवर आणि ४२८ दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान निकृष्ट दर्जाचे आढळून आलेले पेयपदार्थ, अन्नपदार्थ, फळे, भाज्या, मिठाई इत्यादी जप्त करुन नष्ट करण्यात आले आहेत. तसेच सर्व २४ विभागांमध्ये आतापर्यंत सुमारे १ लाख ७० हजार १७५ किलो बर्फ जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

या कारवाई दरम्यान पालिकेच्या 'एल' विभागात सर्वाधिक ७९९ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याखालोखाल 'के पूर्व' विभागात ४१५; तर 'के पश्चिम' विभागात ३१८ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पालिका क्षेत्रात एकूण ४२८ दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 'के पश्चिम' विभागात सर्वाधिक १०७ दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच पालिका क्षेत्रातील २ हजार १६० किलो मिठाई , ६ हजार ४९८ किलो अन्नपदार्थ, ३ हजार १५८ किलो फळे व भाज्या, १० हजार १७२ लिटर पेयपदार्थ इत्यादी देखील जप्त करुन नष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर पालिका क्षेत्रात १ ते १६ जून या कालावधी दरम्यान सुमारे १ लाख ७० हजार १७५ किलो एवढा बर्फ जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक २३ हजार ९०० किलो एवढा बर्फ 'एम पूर्व' विभागातून जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे. त्या खालोखाल १५ हजार किलो बर्फ 'आर दक्षिण' विभागात, तर 'इ' विभागातून १२ हजार ९०० किलो एवढा बर्फ जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे.

उघड्यावरील पदार्थ खावू नका
पालिका क्षेत्रातील बर्फ व पाणी नमुन्यांमध्ये आढळून आलेले इ-कोलाय जीवाणूंचे प्रमाण लक्षात घेता रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाऊ नये, बाहेरील पाणी - सरबत – उसाचा , फळांचा रस इत्यादी पिणे टाळावे, तसेच पाणीपुरी - भेळपुरी सारखे पदार्थ खाणेही टाळावे असे आवाहन पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आले आहे.

डॉक्टरांचा सल्ला घ्या
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जेवणापूर्वी व अन्न शिजवताना, तसेच शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत; घरी शिजवलेले ताजे अन्न खावे, हिरव्या पालेभाज्या - फळे स्वच्छ धुऊन खावेत, तसेच वैयक्तिक स्वच्छता काटेकोरपणे राखण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. मळमळ, उलटी, जुलाब यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी सूचना डॉ. पद्मजा केसकर यांनी केली आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget