मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर रस्स्त्यांची व नालेसफाईची कामे केली जातात. पावसाळयात हि कामे पूर्णपणे बंद असतात. यावर्षी रस्त्यांच्या कामांसाठी पालिका आयुक्तांनी मे महिन्याची डेडलाईन होती. हि डेडलाईन पाळण्यात रस्ते विभाग अपयशी ठरला आहे. मुंबईतील रस्त्यांची कामे रखडल्याने रस्ते विभागाच्या मुख्य अभियंत्यांची चौकशी करावी अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.
मुंबईमध्ये ४२५ रस्त्यांची कामे देण्यात आली. रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मे ची डेडलाईन देण्यात आली. मात्र आज २४ मे सुरु असताना रस्त्यांची फक्त ५० टक्केच कामे झाली आहेत. रस्त्यांची कामे करण्यासाठी एक आठवडा बाकी राहिला आहे. या एका आठवड्यात उर्वरित ५० टक्के कामे पूर्ण होणे शक्य नसल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे. रस्त्यांची कामे रखडण्यामागे खडी आणि रॉ मटेरियल मिळालेले नाही हे मुख्य कारण आहे. खडी मिळवणे हे काम कंत्राटदाराचे असताना कंत्राटदाराना खडी मिळावी म्हणून सत्ताधारी आणि रस्ते विभागातील अधिकारी धावत होते. सत्ताधारी आणि रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी पळापळ करूनही रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्याने रोड विभागाच्या मुख्य अभियंत्यांची चौकशी करावी अशी मागणी रवी राजा यांनी केली.
तसेच मुंबईतील नाल्यांची सफाई करण्यासाठी कंत्राटदार पुढे आलेले नाहीत. यामुळे एनजीओ कडून नालेसफाई करून घेतली जात आहे. अश्या परिस्थितीत नालेसफाई ७८ टक्के झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. हा पालिकेने केलेला दावा किती खरा आहे हे पहिल्या पावसाळयात सिद्ध होईल. नालेसफाई करताना एनजीओच्या कर्मचाऱ्यांना ग्लोज, जॅकेट, गम बूट, इत्यादी सुरक्षेच्या वस्तू दिल्या जात नाहीत. एनजीओचे कर्मचारी असल्याने त्यांची काळजी घेतली जात नाही. या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतील याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप करत एनजीओ कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी पालिका प्रशासनाने घ्यावी तसेच या कर्मचाऱ्यांचा विमा काढावा अशी मागणी रवी राजा यांनी केली.
Post a Comment