मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – शिवसेना आणि भाजप मधील वाद कमी न होता तो दिवसेंदिवस वाढतच आहे मुंबई पालिकेच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्त्यांसाठी खडी उपलब्ध करून दिली आहे. यानंतरही पावसाळयात मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही 'करून दाखवले' बोलणाऱ्यांची असेल असा स्पष्ट इशारा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा वाद चव्हाटय़ावर आला आहे
मुंबईतील पावसाळ्यापूर्वी व नंतर रस्त्याची कामे केली जातात. पावसाळा तोंडावर असल्याने सध्या अनेक रस्त्यांची कामे सुरु आहेत. परंतू हरित लवादाच्या आदेशाने अनेक खडीच्या खाणी बंद केल्याने रस्त्यांची कामे खडी अभावी रखडली होती. याची दखल घेऊन रस्त्यांची कामे पूर्ण होण्यासाठी खडीसह आवश्यक ती सामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केले आहे. त्यानुसार खडी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण केली जावीत, अशी मागणी प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मदती नंतरही प्रशासन रस्त्यांची कामे पूर्ण करून घेण्यास अपयशी ठरले आणि पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडले तर याविरोधात भाजपा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. विकास कामांवर भाजपाच्या प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष असून, जिथे जिथे मुंबईकरांना त्रास होईल, तिथे तिथे भाजपा जनतेसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रभाकर शिंदे यांनी दिला आहे.
विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते. त्यामुळे रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी तसेच त्यावर खड्डे पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाकडून ही कामे करून घेण्याचीही तेवढीच जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रकारची सामुग्री उपलब्ध करून देऊनही रस्त्यांवर खड्डे पडल्यास त्यांची नैतिक जबाबदारी ही 'करून दाखवले' म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांची राहील, असाही टोला प्रभाकर शिंदे यांनी लगावला आहे.
Post a Comment