बिनधास्त आणि चिमणी पाखरं या चित्रपटांच्या यशानंतर देवयानी मुव्हीजचा आगामी संगीतप्रधान चित्रपट ‘तु. का. पाटील’ चित्रीकरणासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मच्छिंद्र चाटे करणार आहेत. ग्रामीण भागातील कथानकावर आधारित तु. का. पाटील चित्रपटात तब्बल १७ गाणी असणार आहेत. पटकथा आणि संवादलेखन केशव काळे यांनी केले आहे. यास संगीतकार राजेश सरकटे यांनी संगीत दिले आहे.
योगिराज माने यांनी १४ गाणी लिहिली आहेत, तर उर्वरित ३ गाणी मराठी पारंपरिक गीतांना नवीन चाल देण्यात आली आहे. यासाठी गायक सुरेश वाडकर, साधना सरगम, सुनिधी चौहान, राजेश सरकटे, स्वप्निल बांदोडकर, अमृता फडणवीस, बेला शेंडे, नितीन सरकटे, आशिक नाटेकर, वैशाली देशमुख, संगीता भावसार, नेहा वैष्णव, राणी तरारे यांनी पार्श्वगायन केले आहे. नृत्यदिग्दर्शनाची बाजू किशू पाल, समाधान सल्गर, संदेश पाटील हे सांभाळत आहे. कॅमेरामन राहुल जाधव, संकलन जफर सुलतान, कलादिग्दर्शन सुधीर तारकर, वेशभूषा क्रांती चाटे व सहदिग्दर्शक सुनील साळुंखे काम पाहत आहेत. या चित्रपटात नागेश भोसले, प्रिया बेर्डे, मैथिली जावकर, उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी, भार्गवी चिरमुले, सुरेखा पुणोकर, भारती नाटेकर, स्मिता शेवाळे, सिद्धेश्वर झाडबुके, संदीप पाठक, संजना नारकर, अशोक शिंदे, अमृता फडणवीस, राजेश सरकटे हे कलाकार भूमिका साकारत आहेत.
मनीष नाटेकर व प्रतीक्षा शिर्के हे नवोदित कलाकार या चित्रपटाद्वारे प्रथमच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच पार पडला. तु. का. पाटील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असा मानस दिग्दर्शक मच्छिंद्र चाटे यांनी व्यक्त केला.
Post a Comment