मध्य रेल्वेकडून गुरूवारी सीएसटी स्थानकाच्या नावात बदल करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली. यापूर्वी स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस असे होते. राज्य सरकारने ‘छत्रपती शिवाजी’ या नावापुढे ‘महाराज’ हे आदरार्थी संबोधन लावण्याचा निर्णय घेतला होता. ‘त्यामुळे सीएसटी स्थानकाची नवी ओळख छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी असेल. मात्र, या स्थानकासाठी असणारा सीएसटीएम (CSTM) हा सांकेतिक कोड कायम राहील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. काही दिवसांपूर्वीच विधानसभेत प्रभादेवी आणि सीएसटी स्थानकाच्या नावात बदलाचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यानुसार एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाला प्रभादेवी, हे नवीन नाव मिळण्याची अपेक्षित आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस होते. या स्थानकाचा युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय वारसा स्थळांमध्ये समावेश आहे. मार्च १९९६ मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस हे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस असे करण्यात आले. देशातील सर्वाधिक गर्दी असणाऱ्या स्थानकांपैकी एक म्हणून सीएसटीची ओळख आहे. याशिवाय सीएसटीला मध्य रेल्वेचे मुख्यालयही आहे. या स्थानकांवरून अनेक उपनगरी आणि एक्स्प्रेस गाड्या सुटतात. सीएसटी रेल्वे स्थानकाचे बांधकाम १८८७ मध्ये पूर्ण झाले. त्यावेळी या रेल्वे स्थानकाला व्हिक्टोरिया टर्मिनस असे नाव देण्यात आले होते. व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या जयंतीनिमित्त या रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आली होती. सीएसटी मुंबईतील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. याच ठिकाणी मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. काही दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान उभारण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाला राम मंदिर नाव देण्यावरुन वाद झाला होता. तर यापूर्वी दादर रेल्वे स्थानकाचे नाव चैत्यभूमी करण्याची मागणी करण्यात आली होती.
Post a Comment