काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजमध्ये कथितरित्या ‘पप्पू’ म्हणणाऱ्या काँग्रेसचे मेरठ येथील माजी जिल्हाध्यक्ष विनय प्रधान यांनी पक्षाला ‘रामराम’ केला. त्यानंतर आपण लवकरच ‘पप्पू मुक्त’ भारत अभियान सुरू करणार असल्याची घोषणा प्रधान यांनी केली आहे. त्याआधी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी राहुल गांधींवर हल्ला चढवला होता. आपलं कौतुक कुणी करतंय, हे ज्या व्यक्तीला समजत नाही ती व्यक्ती वास्तवात पप्पूच आहे आणि मला त्याचा अजिबात पश्चाताप नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि त्यांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या काही नेत्यांवरही त्यांनी तोंडसुख घेतलं.
२२ वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय असलेल्या विनय प्रधान यांनी पुढील राजकीय वाटचालीबाबत प्रश्नांना बगल दिली. भाजप अथवा इतर पक्षात प्रवेश करण्याबाबत त्यांनी उत्तर देणे टाळले असले तरी, पप्पू मुक्त भारत अभियानात काँग्रेसमधील अनेक नेते आपल्याला साथ देण्यास तयार असल्याचा दावा त्यांनी केला.
विनय प्रधान यांनी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर राहुल गांधींचे कौतुक करणारे काही संदेश पाठवले होते. मात्र, त्यांनी या मेसेजसमध्ये राहुल यांचा उल्लेख ‘पप्पू’ असा केला होता. याच नावाने विरोधक राहुल गांधी यांची खिल्ली उडवतात. गांधी यांचे कौतुक करताना प्रधान यांना त्याचं भान राहिलं नाही. ‘पप्पू’ला वाटले असते तर तो अदानी, अंबानी आणि मल्ल्या यांच्याबरोबर हात मिळवू शकला असता. मात्र, त्याने तसे केले नाही. पप्पू मंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकला असता. मात्र, तो त्या रस्त्याने गेला नाही. त्याऐवजी तो मंदसौरला गेला, असा उल्लेख त्यांनी मेसेजमध्ये केला होता. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
Post a Comment