पेनीसुला हॉटेल परिसरातील पालिका मंडईत भाजी विकण्याऐवजी लग्न समारंभ व जंगी पार्टी

फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – जमीन विकसित करताना असलेल्या आरक्षणाचा विकास करत साकीनाका येथे बांधलेल्या पालिका मंडईत गेल्या 7 वर्षांपासून एकदाही भाजी विकली गेली नाही. पेनीसुला हॉटेलच्या मालकाने पालिकेची फसवणूक करत मंडईची इमारत चक्क लग्न समारंभ आणि अन्य जंगी पार्टीसाठी देण्याचा सपाटाच लावला. नुकतेच पालिकेने आक्रमक भूमिका घेत पेनीसुला हॉटेलच्या मालकाला नोटीस बजावली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना पालिकेने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेच्या बाजार विभागास साकीनाका येथील पेनीसुला हॉटेल परिसरातील तळमजला आणि 1 माळयाच्या पालिका मंडईची माहिती विचारली होती. बाजार विभागाचे सहायक अभियंता नि. म. लुमण यांनी अनिल गलगली यांस कळविले की पालिकेने 5 मे 2017 रोजी मेसर्स पेनीसुला नेक्स्टचे मालक करुणाकर राजू शेट्टी यांस नोटीस बजावली आहे. 13 एप्रिल 2017 रोजी पालिकेने प्रत्यक्ष पाहणी केली असता या इमारतीत कोणतेही मंडईत सुरू असावे असे कोणतेही काम सुरु नव्हते. मंडईच्या इमारतीच्या बांधकामात अतिरिक्त बदल करण्यात आले आहे. तसेच मंजूर आराखडयातील तळमजला रिकामा करत त्यात शिल्लक असलेल्या भागाशी जोडला आहे. विशेष म्हणजे या मंडईत कोणताही किरकोळ आणि भाजीचा धंधा सुरुच केला नाही. मंडई इमारतीसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार शेट्टी यांनी बंद केले असल्याची बाब नोटीसमध्ये नमूद करण्यात आली आहे.

पालिकेत मनीषा म्हैसकर पाटणकर या अतिरिक्त पालिका आयुक्त असताना एप्रिल 2010 मध्ये पेनीसुला नेक्स्टचे मालक करुणाकर राजू शेट्टी आणि पालिकेत लीज करार करण्यात आला होता. 2 कोटीच्या प्रीमियमवर शेट्टी यांनी मंडई सुरु करण्याच्या शर्तीवर मंडईची इमारत घेतली असून आज 7 वर्षानंतरही एकदाही ती मंडई सुरु करण्यात आली नाही. स्थायी समितीचे तत्कालीन 2 सदस्य राजहंस सिंह आणि समीर देसाई यांच्या उपस्थितीत आणि पालिका उपायुक्त राजेंद्र भोसले, सहायक आयुक्त दीपक कामत यांच्या संमतीने अतिरिक्त पालिका आयुक्त मनीषा म्हैसकर पाटणकर यांनी शेट्टीशी लीज करार केला आहे. पेनीसुला हॉटेल हे नेहमी वादग्रस्त राहिले असून मंडई सुरु करण्याऐवजी शेट्टी यांनी लग्न समारंभ, दारुच्या जंगी पार्टीसाठी या इमारतीचा सर्रास वापर केला आहे. यामुळे अनिल गलगली यांनी मंडई इमारत पालिकेने ताब्यात घेत तेथे मंडई सुरु करण्याची मागणी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. तसेच पालिकेची फसवणूक करत कोटयावधी रुपये कमवणाऱ्या करुणाकर शेट्टी यांच्याकडून दंड वसूल करत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गलगली यांनी केली आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget