औरंगाबादमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या एका क्लासचालकाला गुरूवारी शिवसैनिकांनी चांगलीच अद्दल घडवली. शिवसैनिकांनी थेट क्लासमध्ये शिरून या क्लासचालकांना चोप दिला. शिवहरी वाघ आणि रोहित सुड असे या क्लासचालकांचे नाव आहे. औरंगाबादच्या आकाशवाणी परिसरात नीट आणि जेईई परीक्षेची शिकवणी घेणाऱ्या आकाश इन्स्टिट्यूटमध्ये शिवहरी वाघ आणि रोहित सुड हे अनुक्रमे व्यवस्थापक आणि सहायक म्हणून काम करतात. रोहित आणि शिवहरी वाघ क्लासमधील एका विद्यार्थीनीला अश्लिल शेरेबाजी करून छळत होते. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. अखेर या प्रकाराला कंटाळून संबधित विद्यार्थीनीने आपल्या पालकांकडे तक्रार केली. ही गोष्ट स्थानिक शिवसैनिकांना समजल्यानंतर त्यांनी आज थेट क्लासमध्ये शिरून शिवहरी वाघ आणि रोहित सुड यांना चोप दिला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या प्रकारानंतर आकाशवाणी भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
Post a Comment