१९ वर्षीय राधा धनेवाले ही तरुणी सध्या सोलापुरातील सर्वात विवाह योग्य वधू ठरलीय. साधारणपणे वधू पिता वराच्या शोधात गावोगाव फिरत असल्याचं सगळीकडे चित्र आहे. राधाच्या घरी मात्र रोज किमान एक ते दोन वरपिता सोयरीक जमवण्यासाठी फेऱ्या मारतायात. ती फार देखणी, उच्चशिक्षित किंवा धनाढ्य बापाची लेक आहे म्हणून नव्हे तर तिच्या हाती विडी कार्ड आहे म्हणून. विडी वळणाऱ्या मुलींसाठी हे विडी कार्ड अक्षरशः गोल्ड कार्ड ठरत आहे.
शाळेत असल्यापासून राधा तिच्या आईसोबत विड्या वळते. त्यामुळे १८ वर्षे पूर्ण झाल्यावर तिला हे विडी कार्ड मिळालं. 'विड्या वळण्यातलं कौशल्य पाहून हे कार्ड दिलं जातं. हे कार्ड मिळाल्यामुळे आता मला लग्नाची किंवा हुंड्याची चिंता नाहीय असं राधा अभिमानाने सांगते.
जवळपास ६५ हजार महिला २०० कारखान्यांमधून विड्या वळतात. एक कात्री आणि धागा हेच यांचं साधन. तेंदू पत्ते सरळ करून त्यात तंबाखू भरून ते पान न फाटता त्याची विडी वळणे हे कौशल्याचं काम असतं. म्हाताऱ्या महिला तरुण मुलींना हे काम शिकवतात.
राधाप्रमाणेच अनेक स्त्रिया दररोज १ हजार विड्या वळतात. त्यातून त्या दिवसाला १४० रुपये कमावतात. त्यातून त्यांचा पीएफ कापला जातो, त्यामुळे त्यांना भविष्याची चिंता नाहीय. विडी कार्डमुळे आता लग्नाचीही चिंता मिटलीय.
शेतीनंतर विडी उद्योग हा देशातील नंबर दोनचा व्यवसाय असल्याचा दावा आहे. शतकाहून अधिक काळ हा व्यवसाय सुरू आहे. मात्र सरकारने यावर अनेक निर्बंध घातलेत. त्यामुळे विडी उद्योग धोक्यात आलाय. विडी उद्योग बंद झाला तर राधासारख्या लाखो महिला बेरोजगार होतील हे मात्र नक्की.
Post a Comment